Pune Crime: पुण्यातील प्रसिद्ध 'वैशाली' रेस्टॉरंटच्या मालकीण Nikita Shetty यांनी पतीविरुद्ध दाखल केली तक्रार, जाणून घ्या कारण

हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

वैशाली रेस्टॉरंट (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुण्यातील (Pune) एफसी रोडवरील (FC Road) ‘वैशाली’ या लोकप्रिय रेस्टॉरंटच्या (Vaishali Restaurant) मालकीण निकिता जगन्नाथ शेट्टी यांनी त्यांचे पती विश्वजीत विनायकराव जाधव (वय 41, रा. घोले रोड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निकीता राहत असलेल्या घरावर त्यांना न माहिती होता जाधव यांनी कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ही तक्रार दाखल केली आहे. एफआयआरनुसार, 12 डिसेंबर 2023 रोजी विश्वजीतने निकिता यांच्याकडून बळजबरीने पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली आणि अधूनमधून त्याचा गैरवापर करून मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित केली.

निकिता यांच्या नावावर असलेली मुदत ठेव रक्कम आणि त्यांच्या वडिलांच्या जीवन विमा पॉलिसीची रक्कमही विश्वजीतने वापरली. जुलै 2023 मध्ये, निकिता यांना कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेच्या महाव्यवस्थापकाचा कॉल आला, ज्यांनी त्यांना जुलैसाठी ईएमआय भरण्यास सांगितले.

त्यावेळी निकिता यांनी त्यांना सांगितले की, त्यांनी बँकेतून कोणतेही कर्ज घेतले नाही. त्यावर जीएमने त्यांना सांगितले की, निकिता यांच्या नावावर 5 कोटी रुपयांचे कर्ज सक्रिय आहे आणि त्याचे मागील ईएमआय देखील भरलेले नाहीत. त्यानंतर निकिता यांनी कागदपत्रे आणि कोटक महिंद्रा बँकेत सादर केलेला कर्ज अर्ज तपासला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अर्जावर त्यांच्या सह्या नाहीत आणि त्यांनी अशा कर्जाचा कोणताही तपशील भरलेला नाही, तसेच अर्जात भरलेली माहिती देखील अपूर्ण आहे.

निकिता यांनी याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर निकिता यांनी पोलिसांकडे धाव घेतली. निकिता यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, कोटक महिंद्रा बँकेच्या कोणत्याही कर्मचार्‍यांनी किंवा अधिकाऱ्याने कर्ज वाटप करण्यापूर्वी त्यांची चौकशी केली नाही किंवा नमूद केलेल्या तपशीलांची पडताळणी केली नाही. (हेही वाचा: Nanded Hospital Tragedy: गुन्हा दाखल झाल्याचे मीडियातून कळाले, कोणतेही अधिकृत कागदपत्र प्राप्त नाही, डॉ. श्यामराव वाकोडे यांची माहिती)

आता मंगळवारी (3 ऑक्टोबर 2023) विश्वजीत विनायकराव जाधव, रवी परदेशी आणि राजेश देवेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध कलम 406, 409, 420 आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी सांगितले.