Special Offer For Punekars: पुणे आणि पिंपरी चिंचवड PMPML बस प्रवास आता केवळ 10 रुपयांत, पुणेकरांसाठी खास ऑफर

या योजनेमुळे पुणे करांना पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) आता केवळ 10 रुपयांमध्ये फिरता येणार आहे.

PMPL | (File Image)

पीएमपीएल (PMPML) म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणेकरांसाठी एक अभीनव योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे पुणे करांना पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) आता केवळ 10 रुपयांमध्ये फिरता येणार आहे. येत्या 19 एप्रिल रोजी पीएमपीएलचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पुणेकरांना प्रशासनाने एक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीएल योजनेचा अधिकाधिक लाभ पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी घ्यावा असे अवाहनही प्रशासनाने केले आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधत पीएमपीएलने 19 एप्रिल 2022 रोजी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा पीएमपीएल चे 15 वे वर्ष आहे. त्यानिमित्त पीएमपीएलने 'बस डे' सोबत इतरही काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्द एकमेकांना लागून आहे. त्यामुळे सहाजिकच दोन्ही शहरांमधून होणारी वाहतूक मोठी आहे. याचाच विचार करुन पीएमपीएलने नागरिकांसाठी ही विशेष भेट दिली आहे. शहरांतील वाहतूक कोंडी, प्रदुषण कमी करण्यासाठी हातभार लावणे हा विचारही त्यामागे असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. (हेही वाचा, Pune Metro: पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोची सुरुवात, किती आहेत तिकीट दर, घ्या जाणून)

दरम्यान, पीएमपीएलची ही सेवा केवळ पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या प्रवाशांसाठीच असणार आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी तिकीट दर हा किमान 5 रुपये ते कमाल 10 रुपये इतका मर्यादित असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील नागरिकांसाठी मात्र प्रवास दरात कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही. त्या प्रवासाचे तिकीट दर कायमच असणार आहे. विशेष म्हणजे पुण्यदशम बस दिवसभरासाठी मोफत राहतील.

पीएमपीएलच्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीएलकडून माहितीपत्रक देण्यात येणार आहे. या माहितीपत्रकासोबत एक कूपन असेल. या कूपनवर प्रवाशांनी स्वत:चे नाव. पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहून पीएमपीएल सेवेबद्दल प्रवाशांनी आपला अभिप्रायही द्यायचा आहे. या कुपनवर एक लकी डॉसुद्धा कढला जाणार आहे. त्याद्वारे प्रवाशांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे.