Pune: बंद झाली पुण्यातील 110 वर्षे जुनी बँक; RBI ने रद्द केला परवाना, ग्राहकांवर होणार मोठा परिणाम

बँकेने 1988 मध्ये अनुसूचित दर्जा प्राप्त केला आणि 1986 ते 1987 पर्यंत प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली.

Representational Image (Photo Credit: PTI)

आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून पुण्यातील (Pune) एक सहकारी बँक कायमची बंद झाली आहे. आरबीआयने (RBI) नुकताच पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Ltd) परवाना रद्द केला. बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे आरबीआयने नोटीसमध्ये सांगितले होते. अशा परिस्थितीत बँकेला 22 सप्टेंबरपासून आपला व्यवसाय बंद करावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांत आरबीआयने अनेक सहकारी बँका आणि वित्तीय संस्थांचे परवाने रद्द केले आहेत.

गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये आरबीआयने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर या बँकेच्या बँकिंग सेवा 22 सप्टेंबरपासून बंद झाल्या. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही त्यामुळे रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला. यामुळे आता आजपासून ग्राहक ना पैसे जमा करू शकतील आणि ना काढू शकतील.

आरबीआयच्या मते बँकेची स्थिती बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह, कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) चे पालन करत नाही. कलम 22(3)(a), 22(3)(b), 22(3)(c), 22(3)(d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. या बँकेच्या ग्राहकांना आरबीआयच्या ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) विमा योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यतच्या ठेवीवर विमा संरक्षण मिळेल. (हेही वाचा: Reserve Bank of India कडून महाराष्ट्र Lakshmi Co-operative Bank Limited चा परवाना रद्द)

म्हणजेच, या नियमानुसार, खराब आर्थिक स्थितीमुळे बँक बंद करावी लागल्यास, ग्राहकाला डीआयसीजीसीच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाचा लाभ मिळतो आणि ते पैसे ग्राहकांना मिळतात. ज्या ग्राहकांनी या बँकेत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे, त्यांना त्यांची पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्यांना फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच भरपाई दिली जाईल.

दरम्यान, कै.गोविंदराव धारप, कै.केशवराव डोके आणि कै.काळुरामभाऊ नाईक हे या बँकेचे संस्थापक सदस्य होते. बँकेने 1988 मध्ये अनुसूचित दर्जा प्राप्त केला आणि 1986 ते 1987 पर्यंत प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली.