Prohibitory Orders in Mumbai: मुंबईमध्ये 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; कलम 144 लागू, फ्लाईंग कंदिल उडवण्यास बंदी
दुसरीकडे, दिवाळीचा सण जवळ येत असल्याने बाजारपेठा गजबजून जात आहेत, या पार्श्वभुमीवर हे आदेश शहरात जारी करण्यात आले आहेत.
आगामी दिवाळीचा सण आणि अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी कायदा व सुरक्षा बिघडू नये म्हणून काही कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. 13 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, आता मुंबई मध्ये 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान जमावबंदी लागू केली जाणार आहे. त्यासाठी कलम कलम 144 लागू असेल आणि जमावबंदीच्या नियमांचा भंग केल्यास पोलिस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी (ऑपरेशन) संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. यामध्ये 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत फ्लाईंग कंदील उडवण्यासही बंदी असेल.
मुंबईतील कोणत्याही मिरवणुकीला मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असून, कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वापरणे आणि फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
लग्न समारंभ, अंत्ययात्रा, तसेच कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटना, सामाजिक मेळावे, चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्था यांच्या सभांना जमावबंदीच्या आदेशातून सूट देण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी ठाकरे आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेल्याने मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, दिवाळीचा सण जवळ येत असल्याने बाजारपेठा गजबजून जात आहेत, या पार्श्वभुमीवर हे आदेश शहरात जारी करण्यात आले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रातील 20 बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, पाहा यादी)
दरम्यान, संजय लाटकर यांनी 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत उडते कंदील (Flying Lanterns) उडवण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, ‘मुंबई पोलिसांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात सध्याच्या परिस्थितीमुळे’ आकाशात उडते कंदील वापरल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.