President Droupadi Murmu Maharashtra Tour: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर; 29 जुलै रोजी मुंबईत विधानभवनात आमदारांना करणार संबोधित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, 29 जुलै, 2024 रोजी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे.

President Droupadi Murmu (pc - X/ANI)

President Droupadi Murmu Maharashtra Tour: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) 28 जुलैपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. येत्या 29 जुलै रोजी राज्य विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र विधिमंडळाला संबोधित करणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभागृहाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यमान आमदार आणि विधानपरिषद सदस्यांसह 172 माजी विधानपरिषद सदस्यही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, 29 जुलै, 2024 रोजी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी 3.30-5 यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील निवड केलेल्या सन्माननीय सदस्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे,

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात 28 जुलै रोजी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनाने होणार आहे. यानंतर त्या लिज्जत पापड कंपनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 29 जुलै रोजी पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या पदवीदान समारंभाला राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी मुंबईत विधान परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहे. (हेही वाचा; Guardian Minister of Sambhajinagar: संदिपान भुमरे यांचा राजीनामा, अब्दुल सत्तार संभाजीनगरचे नवे पालकमंत्री)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर, पुणे-मुंबई तसेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांनाही भेट देणार आहेत. 30 जुलै रोजी राष्ट्रपती नांदेड येथील गुरुद्वाराला भेट देणार आहेत. यानंतर त्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला रवाना होतील आणि बुद्ध विहारच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.