Chandrakant Patil On Shivsena: शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो.

Chandrakant Patil (Photo Credit - Facebook)

Chandrakant Patil On Shiv Sena: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत अनेक बदल झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षातील 40 आमदार घेऊन भाजप पक्षासोबत सरकार स्थापन केलं. सध्या राज्यातील शिवसेना पक्षाचे दोन गट झाले असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटामध्ये दाखल होत आहेत. अशातचं आता भाजप नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना पक्ष कधी फुटला यासंदर्भात भाष्य केलं आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असं विधान पाटील यांनी यावेळी केलं. (हेही वाचा - Shiv Sena Election Symbol: धनुष्यबाण कोणाचा? शिवसेना निवडणूक चिन्हावर आयोग आजच घेणार निर्णय?)

चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवले तेव्हा अनेकांनी मला नावं ठेवली होती. पण, तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत यासंदर्भात विचार करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला मोठं धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारने घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आम्ही जे प्रकल्प सुरू केले, ते रद्द करण्याचे काम महाविकास आघाडी सकारने केले, असा आरोपही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.