Mumbai Local सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जय्यत तयारी; सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम सज्ज
यामुळे लोकलसेवा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
कोविड-19 (Covid-19) संकटामुळे मार्च 2020 पासून बंद असलेली मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. यामुळे लोकलसेवा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र यासाठी ठराविक वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सकाळी पहिल्या लोकल पासून 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 4 या वेळेत आणि रात्री 9 ते शेवटची लोकल या कालावधीत सर्वसामान्यांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, यासाठी रेल्वे प्रशासनही सज्ज झाले आहे. कोविड-19 संकटाचा धोका टाळण्यासाठी विशेष तयारी केली जात आहे. (Mumbai Local 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवासासाठी खुली पण केवळ 'या' वेळेत करता येणार प्रवास)
वेस्टर्न रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले की, मुंबईत पुन्हा सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. आसन क्षेत्र आणि केबिन्स सॅनिटाईज करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. आम्ही एन्ट्री-एक्सिट पॉईंट्स, तिकिट बुकिंग काऊन्टर्स वाढवत आहोत. तसंच गर्दी नियंत्रित करण्यासाठी आमचे कर्मचारी उपलब्ध असतील.
ANI Tweet:
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नसल्याने कोरोना संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर अतिरिक्त ट्रेन्स धावण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. 2,781 ट्रेन्स ऐवजी 2,985 ट्रेन्स उपलब्ध होणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांची संख्या 1,580 वरून 1,685 करण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर 1,201ऐवजी 1,300 लोकल्स धावणार आहेत.