लज्जास्पद! केवळ नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, यवतमाळमधील क्रूर घटना
पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्रमांक 30 मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला
यवतमाळमध्ये (Yavatmal) हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. माणसाची भ्रष्ट झालेली बुद्धी त्याला किती खालच्या थराला घेऊन जाऊ शकते, हे यातून स्पष्ट होते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार करण्यात आली. लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, या वाघिणीची नखे मिळविण्यासाठी हे दुष्कर्म करण्यात आले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या वाघिण 4 बछड्यांची आई बनणार होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्रमांक 30 मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला.हेदेखील वाचा- भयानक! शिकाऱ्याने नाही तर चक्क वाघानेच केली वाघिणीची शिकार
मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी हे पाहिले असेल आणि वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले.
गर्भवती वाघिणीच्या पोटात चार बछडे होते. आरोपींचा शोध सुरू असल्याचे संबंधित वनाधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीव रक्षक घटनास्थळी पोहोचताच चार वर्षीय वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकलेला दिसून आला. परिसरात बांबूच्या काड्या, क्लच वायर आणि जाळल्याच्या खुणा आढळून आल्या.
याआधीही यवतमाळमध्ये वाघाची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही घटना अत्यंत क्रूर असून आरोपींना पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होतेय.
(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2021 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

