Poonam Mahajan: प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे कौटुंबीक कारण नाही; कन्या पूनम यांचे खळबळजनक वक्तव्य
दुसऱ्या बाजूला प्रमोद यांच्यावर गोळ्या झाडणारा त्यांचा भाऊ प्रविण याच्या पत्नीने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कुटुंबामध्ये चाललंय तरी काय, असा सवाल उत्पन्न झाला आहे. एका बाजूला पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर प्रवीण महाजन (Pravin Mahajan) यांची पत्नी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला पूनम महाजन यांनी तर थेट प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे कौटुंबीक अथवा पैशांचे कारण नाही, तर ते एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरु असताना या दोन्ही कुटुंबातील महत्त्वाच्या लोकांनीच महत्त्वाच्या लोकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
पूनम महाजन काय म्हणाल्या?
प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. त्यांच्या राहत्या घरात त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन याने 2006 मध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या केली. या हत्येला आता प्रदीर्घ काळ उलटून गेला असताना त्यांच्या हत्येचे प्रकरण अचानक चर्चेत आले आहे. 'झी 24 तास' या वृत्तवाहिनीच्या 'जाहीर सभा' या कार्यक्रमात बोलताना महाजन यांच्या कन्या पूनम यांनी केलेल्या विधानामुळे ही चर्चा सुरु झाली आहे. पूनम महाजन यांनी म्हटले आहे की, प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे पैसा किंवा मत्सर अशी कौटुंबीक कारणे नाहीत. त्यांची हत्या हे मोठे षडयंत्र आहे. आज ना उद्या ते बाहेर येईलच. आजवर महाजन कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीने या हत्याप्रकरणाबद्दल जाहीर वाच्यता केली नाही. मात्र, जवळपास दोन दशकांनी म्हणजेच तब्बल 20 वर्षांनी या कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती या प्रकरणावर भाष्य करताना दिसत आहे. (हेही वाचा, प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांची मोदी सरकारवर टीका म्हणाले 'महागाई, बेरोजगारी, GDP यांचे उत्तर 'राष्ट्रवाद' नव्हे')
दरम्यान, पूनम महाजन यांचे वक्तव्य एका बाजूला असतानाच दुसरीके प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी यांनी मुंडे भावा बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह पंकजा मुंडे यांनी संगनमताने कारस्थान रचत आमच्यावर दबाव टाकला. त्यांनी जबरदस्तीने आमची कोट्यवधी रुपयांची जमीन अतिशय अल्प किमतीत खरेदी केली, असा दावा सारंगी यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जमीन बिड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असलेल्या जिरेवाडी येथे आहे. मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मध्ये आपली जमीन असून ती, या भावा बहिणीने संगणमताने लाटली आहे. ज्याची किंमत आजघडीला कोट्यवधी रुपये इतकी आहे. सारंगी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. या आरोपांवर आता मुंडे कुटुंबीय काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.