Nagpur Winter Session 2019: प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदी निवड
सुरजितसिंह ठाकूर,पंकजा मुंडे, सुरेश धस यांंना मागे टाकत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी आता भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांची वर्णी लागली आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे हिवाळी अधिवेशन आज (16 डिसेंबर) पासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. दरम्यान आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा केली आहे. अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत प्रवीण दरेकरांना हा मान मिळाला आहे. महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन: देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजप नेत्यांनी 'मी पण सावरकर' लिखित टोपी घालून केली विधान भवनात एंट्री.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही बहुमताचा आकडा पारकरू न शकल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर भाजपासाठी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. दरम्यान या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर,पंकजा मुंडे, सुरेश धस अशी नावं आघाडीवर होती. एनसीपी नेते धनंजय मुंडे यापूर्वी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते.
प्रवीण दरेकर यांची राजकीय सुरूवात शिवसेनेपासून झाली. दरम्यान त्यांनी मनसे पक्षातून विधानसभा लढवली होती. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. मात्र नंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला. आता त्यांची वर्णी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते पदी लागली आहे.
यंदा महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन 16-21 डिसेंबर दरम्यान होणार आहे.