Pratap Sarnaik यांनी कुटुंबासह तुळजाभवानी ला 75 तोळे सोनं दान करून फेडला नवस!
ते सहकुटुंब देवीच्या दर्शनाला आले होते.
आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्याकडून तुळजा भवानीच्या (Tuljabhavani) चरणी 75 तोळे अर्पण करण्यात आले आहे. नुकतीच प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब तुळजापूर मंदिरात देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आपला नवस फेडताना 75 तोळे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. देवीचा नवस फेडताना त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये मुलांच्या नीट वैवाहिक आयुष्यासाठी केलेला नवस आता पूर्ण करण्यात आला आहे. त्यामध्ये एका मुलासाठी 51 तोळ्यांच्या पादुका आणि दुसर्यासाठी 21 तोळ्याचा सोन्याचा हार नवस फेडताना देण्यात आला आहे. अंदाजे या दागिन्यांची किंमत 37 लाख 50 हजार रूपये आहे.
कोरोना संकटामध्ये मंदिरं बंद असल्याने आणि नंतर कुटूंबावर आलेल्या संकटामुळे देवीचं दर्शन घेणं शक्य नव्हतं. पण आता सारं सुरळीत झाल्याने प्रताप सरनाईक हे पत्नी, मुलं, सुना आणि नातवंडांसह तुळजापूरला दर्शनाला आले होते. यावेळी त्यांच्या नातवंडाचं जावळ देखील करण्यात आले. 'आपण दरवर्षी 2-4 वेळेस अवश्य देवीच्या दर्शनाला येतो. यावेळेस वेळ काढून देवीचा नवस फेडायला आलो. ही आमची कुलदैवत आहे.' असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान दागिने 2 वर्षांपूर्वीच बनवले आहेत पण मध्यंतरी शक्य न झाल्याने देवळात येऊ न शकल्याचं ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Pratap Sarnaik Vs Kirit Somaiya: आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा .
सरनाईक कुटुंबांचं तुळजा भवानी दर्शन
प्रताप सरनाईक हे शिवसेना पक्षात होते. पण पक्षात फूट पडल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक देखील युवासेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदेंसोबत आला आहे. मध्यंतरी सरनाईक कुटुंबावर ईडीच्या धाडीचं संकट होते. याबाबत मीडीयाशी फारसं बोलणं त्यांनी टाळलं आहे. पण एका विशिष्ट पक्षासोबत असल्याने अमुक एक केस बंद करणं शक्य नसतं. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि सध्या ती सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.