Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून काढून घेतली एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम; जाणून घ्या कारण
याशिवाय या योजनेच्या जुन्या पद्धतीतही सरकारने काही बदल केले आहेत. आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ केवळ अशाच शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेती आहे
पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजना अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 7 हप्ते जाहीर केले आहेत. मोदी सरकार होळीच्या आसपास योजनेचा 8 वा हप्ता जारी करू शकते. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील प्रशासनाने किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरलेल्या, 1,709 शेतकर्यांकडून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
तहसीलदार विशाल दौडकर म्हणाले की, या योजनेसाठी लाभार्थी म्हणून 1,04,552 शेतकर्यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्यामध्ये 3.32 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र 3,452 शेतकरी आयकर भरत असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असल्याचे दिसून आले. आता प्रशासनाने 1,709 शेतकर्यांकडून 1.73 कोटी रु काढून घेतले आहेत. त्याचबरोबर इतर पात्र नसलेल्या शेतकर्यांकडून पैसे काढण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. या योजनेंतर्गत 2 हेक्टर किंवा 5 एकर शेतीयोग्य शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त पंतप्रधान-किसान सन्मानाचा हप्ता पाठविला जातो. आता सरकारने होल्डिंगची मर्यादा रद्द केली आहे. मात्र, जर कोणी आयकर विवरण भरत असेल तर त्याला पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून वगळले जाते. (हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या जेवणाऐवजी गुरांचे खाद्य मिळाल्याने पुण्यातील शासकीय शाळेत गोंधळ)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 डिसेंबर 2019 पासून आधार आवश्यक झाला आहे. याशिवाय या योजनेच्या जुन्या पद्धतीतही सरकारने काही बदल केले आहेत. आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ केवळ अशाच शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेती आहे. म्हणजे पूर्वीप्रमाणे ज्यांची वडिलोपार्जित जमीन होती त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.