Power Crisis: महाराष्ट्रात निर्माण होणार मोठे वीज संकट? महावितरणला वीज पुरवठा करणारे 13 औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद

भारतामधील अनेक भागातून वीज संकटाच्या (Power Crisis) बातम्या आहेत. त्याचा परिणाम आर्थिक राजधानी मुंबईतही दिसू लागला आहे

Representational Image (Photo credits: PTI)

सध्या देशात कोळसा संकटाचा (Coal Shortage) परिणाम दिसू लागला आहे. भारतामधील अनेक भागातून वीज संकटाच्या (Power Crisis) बातम्या आहेत. त्याचा परिणाम आर्थिक राजधानी मुंबईतही दिसू लागला आहे. महाराष्ट्रात 13 वीज प्रकल्प बंद झाले आहेत, ज्यामुळे राज्यात 3,300 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई वगळता उर्वरित राज्यात रविवारी 18,000 मेगावॅटची कमतरता होती. मात्र, कोळशाचा पुरवठा लवकरच सुधारेल, असे केंद्र सरकार वारंवार सांगत आहे. महाराष्ट्रामध्ये वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनुसार, चंद्रपूर, भुसावळ, नाशिक आणि इतर काही ठिकाणी वीज प्रकल्प कार्यरत नाहीत. राज्याचा ऊर्जा विभाग सध्या जलविद्युत आणि इतर स्रोतांमधून वीज पुरवठा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वीज विभागाने लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत गरज असतानाच वीज वापरावी.

ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे म्हणाले की, आमच्याकडे फक्त दीड दिवस चालेल इतका कोळसा साठा आहे. आम्ही वारंवार केंद्राकडे कोळसाची मागणी करत आहोत, परंतु आम्हाला पाठवलेला कोळसा पुरेसा नाही. अशा स्थितीत आम्हाला लोडशेडिंग करावे लागेल. दुसरीकडे मंत्रालयाने असेही बजावले आहे की, जर पीपीएनुसार वीज उपलब्ध असूनही कोणतीही वीज वितरण कंपनी लोडशेडिंगचा अवलंब करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Maharashtra Bandh: लखीमपुर खेरी हिंसेविरुद्ध महाराष्ट्र बंदची हाक; संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने राहणार बंद)

यावर्षी सप्टेंबर पर्यंत देशातील कोळशावर आधारित वीज निर्मिती 24 टक्क्यांनी वाढली आहे. वीजनिर्मिती केंद्रांना चांगला पुरवठा झाल्यामुळे उत्पादन वाढले आहे. देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत इंधनाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, कोळसा मंत्रालयाने देशात पुरेसा कोळसा साठा असल्याचे म्हटले आहे.