Pooja Chavan Suicide Case: नॉट रिचेबल वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी मंदिरात प्रकटण्याची शक्यता, जाणून घ्या कार्यक्रम
वनमंत्री राठोड यांचा आज दिवसभरातील दौराही जाहीर झाला असून, प्रसारमाध्यमांनी या दौऱ्याबाबत वृत्त दिले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ( Pooja Chavan Suicide Case) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathore) प्रदीर्घ चर्चेनंतर आज (मंगळवार, 23 फेब्रुवारी) सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून ते नॉट रिचेबल मोडवर आहेत. आज सकाळी साडेआकराच्या सुमारास ते पोहरादेवी मंदिर (oharadevi Temple) येथे येणार आहेत, अशी माहिती आहे. वनमंत्री राठोड यांचा आज दिवसभरातील दौराही जाहीर झाला असून, प्रसारमाध्यमांनी या दौऱ्याबाबत वृत्त दिले आहे.
दुसऱ्या बाजूला हायहोल्टेज प्रकरणाच्या चर्चेनंतर वनमंत्री पोहरादेवी येथे येेणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोहरादेवी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. वनमंत्री राठोड आणि त्यांची समाजात असलेली लोकप्रियता, समाजाचे आणि पक्षाचे कार्यकर्ते आदींमुळे या परिसरात गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस तैनात करण्यात आल आहेत. मुख्य रस्त्यावर बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. या परिसरात बॉम्बशोधक पथकही दाखल झाले आहे. (हेही वाचा, वनमंत्री संजय राठोड येत्या 23 फेब्रुवारीला पोहरादेवीत येणार, येत्या मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता)
संजय राठोड यांचा दौरा कसा आहे?
- सकाळी 9 च्या सुमारास आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवी मंदिराकडे निघणार
- सकाळी 11.30 वाजता पोहरा देवी मंदीर परीसरात दाखल होणार
- दुपारी 1 वाजता पोहरादेवी दर्शन झाल्यानंतर दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे रवाना
- दुपारी 2.30 च्या सुमारास मुंगसाजी महाराज संस्थानात दाखल होतील.
- दुपारी 3.30 च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कोरोना नियंत्रणाबाबत आढावा घेतील.
- दौरा संपल्यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाकडे निघतील
दुसऱ्या बाजूला वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस दिली आहे. राज्यात सध्या कोरोना संसर्गाची भीती असल्याने सर्वत्र निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन या निर्बंधांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या कार्यक्रमासाठी केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असल्याचे म्हटले आहे.