Politics of Maharashtra: राज ठाकरे यांच्या राजकारणाचे सूत्र, विरोधकांशी कधी जवळीक, कधी प्रहार; घ्या जाणून

त्यांनी अनेकदा विविध विषयांवरुन भूमिका घेतल्या आहेत. त्या भूमिका बदलल्याही आहेत. ज्यावरुन त्यांना समाजातून पाठींबा आणि विरोध अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत.

Raj Thackeray | Photo Credit - Twitter

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत आहेत. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa ) आणि मशिदींवरील भोंगे यांवरुन त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हे या चर्चेचे कारण. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निगाले असले तरी, त्यांचे चर्चेत असणे नवे नाही. या आधीही त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिका वादाच्या आणि चर्चेच्याच ठरल्या आहेत. त्यांनी अनेकदा विविध विषयांवरुन भूमिका घेतल्या आहेत. त्या भूमिका बदलल्याही आहेत. ज्यावरुन त्यांना समाजातून पाठींबा आणि विरोध अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेना पक्षाची स्थापना 2006 मध्ये केली. आक्रमक आणि वादग्रस्त भाषणे भूमिका ही त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांची जोरदार स्तुती केली होती. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जो विकास केला आहे तो महाराष्ट्रातील नेत्यांनी जाऊन पाहावा असे अवाहनही त्यांनी केले होते. मात्र, पुढे त्यांचे धोरण बदलले त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इतका की 2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इतर विरोधी पक्षांपेक्षाही राज ठाकरे यांचा प्रचार भाजपविरोधात प्रभावी होता. (हेही वाचा, Loudspeaker Controversy: 'राज ठाकरेंवर कारवाई झाल्यास आंदोलन करू', MNS नेत्यांचा महाराष्ट्र सरकारला इशारा)

लोकसभा निवडणूक 2019 नंतर ते शरद पवार यांच्या जवळ गेले. राहुल गांधी यांचेही त्यांनी कौतुक केले. त्यांनी विधानसभेसाठी 101 जागांवर निवडणूक लढली. परंतू, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, 2008 मध्ये त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात हिंसक आंदोलन केले. नंतर त्यांनी मराठी पाट्यांवरुनही आंदोलन केले. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांनाही त्यांनी विरोध केला होता. 2020 मध्ये त्यांनी तबलीगी जमातबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता त्यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.