पंढरपूर येथील माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 1200 पेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस
कोरोनामुळे कोणत्याही दिंड्या अथवा वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश नसल्याने या वारकऱ्यांचे निवासाचे ठिकाण असलेले शहरातील मठ व धर्मशाळांनी कोणत्याही भाविकाला निवासासाठी थांबवू नये, अशा स्वरूपाच्या या नोटीस आहेत.
महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक जिल्ह्यात संचारबंदी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पंढरपूरात (Pandharpur) होणा-या माघी यात्रेकरता (Maghi Yatra) अनेक दिंड्या आणि वारकरी पंढपूरात दाखल होतात. यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांकडून पंढरपूरातील 1200 पेक्षा अधिक मठ आणि धर्मशाळांना नोटिस पाठविण्यास सुरुवात केली आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुळे कोणत्याही दिंड्या अथवा वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश नसल्याने या वारकऱ्यांचे निवासाचे ठिकाण असलेले शहरातील मठ व धर्मशाळांनी कोणत्याही भाविकाला निवासासाठी थांबवू नये, अशा स्वरूपाच्या या नोटीस आहेत.
मात्र यात्रेपूर्वीच पंढरपूरात हजारो भाविक दाखल झाले असल्याने या भाविकांना बाहेर काढणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे. माघी यात्रेत भाविकांना रोखण्यासाठी कोल्हापूर रेंजमधून जवळळपास 700 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 80 अधिकारी असणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव! BMC ने सील केल्या 1,305 इमारती
राज्यात कोरोनाचे वाढते संकट पाहून माघी यात्रेसाठी मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. सध्या रोज येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर दोन तासाला विठ्ठल मंदिर सॅनिटायझेशनला सुरुवात करण्यात आली आहे. माघी एकादशी 23 फेब्रुवारीला होणार असली तरी विठ्ठल मंदिर 21 फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजता भाविकांसाठी बंद होणार असून 24 तारखेला पहाटे सहा वाजता पुन्हा कोरोनाचे नियम पाळून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
माघी एकादशीच्या विठ्ठल व रुक्मिणी पूजेला केवळ पाच जणांना परवानगी दिली असून यांनाही मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.