Police Bharti: पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार माजी सैनिकाचा मैदानावरच मृत्यू; मुंबई येथील घटना
सचिन कदम असे या तरुणाचे नाव आहे. सचिन कदम हे माजी सैनिक होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर ते माजी सैनिक गटातून पोलीस भरतीसाठी उतरले होते.
Mumbai Police Bharti: मुंबई पोलीस दलासाठी भरती प्रक्रिया सुरु असताना मैदानी चाचणी (Police Recruitment Field Test) दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन कदम असे या तरुणाचे नाव आहे. सचिन कदम हे माजी सैनिक होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर ते माजी सैनिक गटातून पोलीस भरतीसाठी उतरले होते. दरम्यान, मैदानी चाचणी सुरु असताना धवता धावता ते मैदानावरच कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई येथील एका मैदानावर रविवारी (16 एप्रिल) रोजी घडली. सचिन कदम यांच्यासह मुंबई पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू होणाऱ्या उमेदवारांची संख्या चारवर पोहोचली आहे. पोलीस भरती दरम्यान होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण काही अंशी वाढल्याचे बोलले जात आहे. सांगितले जात आहे की, अनेक तरुण शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतानाही पोलीस भरतीसाठी उतरतात. परिणामी अनेकदा अप्रिय घटना घडतात.
मुंबई पोलीस दलात रिक्त असल्या 7076 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवीण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया कलीना मैदानासह मुंबईतील इतरही विविध मैदानांवर राबविण्यात येत आहे. याच भरती साठी मुळचे खेड तालुक्यातील दहिवली गावचे रहिवासी असलेले सचिन कदम हे माजी सैनिक गटातून भरतीसाठी उतरले होते. त्याचसाठी ते मुंबईत आले होते. मैदानी चाचणीदरम्यान 1600 मीटर धावण्याची चाचणी सुरु होती. चाचणीची तिसरी फेरी सुरु असताना कदम हे धावपट्टीवरच कोसळले. मैदानावर कोसळून कदम हे बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळच्याच रुगणालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. कदम यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शविविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण पुढे येऊ शकेल असे पोलीस म्हणाले. (हेही वाचा, Unemployment in Maharashtra: पोलीस भरतीमुळे पुढे आले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयान वास्तव, 14 हजार जागा, 18 लाख अर्ज)
दरम्यान, यापूर्वीही पोलीस भरती दरम्यान उमेदवारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या आधी विकास काळे नामक युवकाचा पोलीस भरती दरम्यान धावताना 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. गणेश तरुण या उमेदवाराचा 17 फेब्रुवारी रोजी वाशिम येथील मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू जाला. अमरावती येथील अशोक सोळंकी नामक युवकही मैदानी चाचणीनंतर हॉटेलमध्ये परतला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला.
वाढती उष्णता, उष्णतेच्या काळात घ्यावयाच्या आरोग्याच्या काळजीकडे होणारे दुर्लक्ष, तरुणांचा स्वत:च्या आरोग्याकडे पाहण्याचा बेफीकीरपणा, शारीरिक चाचणीसाठी आवश्यक पात्रतेेसंदर्भात होणारी लपवाछपवी यांसारखे आणि इतरही घटक मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे अभ्यासक सांगतात.