लुडो गेमच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्यांंवर पोलिसांची कारवाई; महाराष्ट्रातील पहिला गुन्हा दाखल
जुगारात डिजिटल माध्यमातून लुडो हा खेळदेखील खेळला जात होता, मात्र त्यावरही आता पोलिसांनी करडी नजर ठेऊन कारवाई केली आहे
आतापर्यंत जुगाराच्या नावाखाली सट्टा लावणे, पत्ते खेळणे अशांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे वृत्त आपण ऐकले होतो, मात्र आता लुडो गेम खेळणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. याबाबतची राज्यातील बहुदा पहिलीच कारवाई हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील चुंचा या गावात केली गेली आहे. मोबाईलवर लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या सात जणांवर बुधवारी आखाडा बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 28 हजार रुपये रोख व सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
चुंचा या गावातील राष्ट्रीय महामार्गावरील एका लिंबाच्या झाडाखाली लुडो गेमवर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावर तडक अॅक्शन घेत, पोलिसांनी सध्या वेशात घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संजय परसराम मोहिते, सुनील दत्तराव कनके, गणपत सीताराम पवार, परसराम हरसिंग जाधव, पांडुरंग संभाजी चंद्रवंशी, सय्यद आरेफ, रामराव शेळके हे लुडो जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 28 हजार रुपये आणि 30 हजार रुपयांचे सहा मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
गेले काही दिवस आखाडा बाळापूर परिसरात विविध मार्गांनी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना होती. यात डिजिटल माध्यमातून लुडो हा खेळदेखील खेळला जात होता. मात्र त्यावरही आता पोलिसांनी करडी नजर ठेऊन कारवाई केली आहे.