Varsha Raut In ED Office: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

ईडीचे एक पथक प्रताप सरनाईक यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते. या वेळी या पथकाने प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग यांनाही चौकशीसाठी सोबत घेतले होते.

Sanjay Raut, Varsha Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (, Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut ) या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात दाखल झाल्या आहेत. सोमवारी (4 डिसेंबर 2021) साधारण दुपारी 3 वाजणेच्या सुमारास वर्षा राऊत ईडी (ED) कार्यालयात दाखल झाल्या आहेत. राऊत यांना ईडी कार्यालयाकडून काही दिवसांपूर्वी नोटीस आली होती. या नोटीशीनुसार राऊत यांना कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार, वर्षा राऊत यांनी एका व्यवहारात कथीत 55 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याबाबतच ईडी चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) सोमवारीच प्रवीण राऊत यांना झटका दिला आहे. प्रवीण राऊत यांची सुमारे 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे उद्योजक असून त्यांचे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे मानले जाते.

वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात या आधीच बोलावले होते. मात्र, वर्षा राऊत यांनी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आपले वकील आणि इतर माहिती घेण्यासाठी अवधी मागून घेतला होता. वर्षा राऊत यांना ईडीनेही वेळ वाढवून दिला. आता नियोजीत वेळेनुसार वर्षा राऊत इडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. (हेही वाचा, Sanjay Raut on ED Notice: ज्यांच्याकडे लपविण्यासारखे असते ते भाजप प्रवेश करतात- संजय राऊत)

वर्षा राऊत यांच्याआधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीची नोटीस आली आहे. ईडीचे एक पथक प्रताप सरनाईक यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते. या वेळी या पथकाने प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग यांनाही चौकशीसाठी सोबत घेतले होते. दरम्यान, प्रताप सरनाईक कुटुंबीयांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. ईडी सरनाईक कुटुंबीयांची चौकशी करु शकते मात्र त्यांना अटक करु शकत नाही असे न्यायलायने म्हटले आहे.

ईडीची कारवाई ही सुडापोटी केली जात आहे. या कारवाईचे बोलते बोलवते धनी वेगळे आहेत. तरीही एक सरकारी आणि प्रमुख संस्था म्हणून ईडीच्या नोटीसचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

दरम्यान, ईडी ही एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. ती स्वतंत्रपणे काम करते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी या चौकशीला राजकीय स्वरुप देऊ नये. एका बाजूला राज्य सरकार आणि बीएमसीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ताकाळात पत्रकारांना अटक होते, एखाद्या अभिनेत्रीचे घर तोडले जाते. त्यावर न्यायालय ताशेरे ओढते. ती कारावाई सुडाची नसते. परंतू, मध्यवर्थी संस्थांनी केलेली कारवार्ई सूडाची असते. शिवसेनेने हीदुटप्पी भूमिका सोडून द्यावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.