IPL Auction 2025 Live

Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar: कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक; पिंपरी- चिंचवड पोलिसांडून बेड्या

खासगी कंपनीचे कुंपन आणि रस्ता जेसीबी लावून उखडले प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Chaitanya Maharaj Wadekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

चैतन्य महाराज वाडेकर (Chaitanya Maharaj Wadekar) म्हणजे सोशल मीडियावर भलतेच प्रसिद्ध असलेले प्रकरण. स्वत:ला कीर्तनकार (Kirtankar) म्हणवणारे आणि सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून उपदेशाचे डोस पाजणाऱ्या या महाराजांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) अटक केली आहे. या महाराजांनी चक्क एका कंपनीचा खासगी रस्ता आणि कंपाऊंड जेसीबा लावून रातोरात खणून आणि उखडून टाकला आहे. या प्रकाराबाबत प्राप्त तक्रारीवरुन कारवाई करत पोलिसांनी त्यांच्यावर अटकेच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. नेमके प्रकरण आहे तरी काय? घ्या जाणून.

चाकण एमआयडीसी हद्दीतील जमिनीवरुन वाद

कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर आणि त्यांच्या कुटुंबीय चाकण एमआयडीसी हद्दीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा एका बिल्डरसोबत जमिनीवरुन जुना वाद आहे. सरकारी मोजनीद्वारे हा वाद सोडवला जावा, अशी वाडेकर कुटुंबीयांची भूमिका. पण पाठिमागील अनेक वर्षांपासून त्यांची ही मागणी प्रत्यक्षात येत नव्हती. त्यावरुन सुरु असलेला वाद कोर्टातही गेला होता. दरम्यान, कोर्टामध्ये निकाल वाडेकर यांच्या बाजूने लागला आणि प्रत्यक्ष सरकारी मोजणी करुन घ्यावी, असा कोर्ट आदेश आला. दरम्यानच्या काळात त्यांच्या शेजारची जागा एका बिल्डरने विकसित केली आणि त्यावर कंपाऊंड टाकून खासगी रस्ताही तयार केला. शिवाय तेथे एक कंपनीही उभारली. (हेही वाचा, Bandatatya Karadkar Arrested: कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले)

दरम्यान, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आल्याचे पाहून चैतन्य महाराज वाडेकर यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. महाराजांनी आपल्या तिन भावांसह आणखी काही सहकाऱ्यांना बोलावून घेतले आणि एका रात्रीच जेसीबी लावून कंपाऊंड, खासगी रस्ता उखडला आणि खणून टाकला. धक्कादायक म्हणजे वाडेकरांनी सरकारी मोजणी होईपर्यंतही वाट न पाहता सदर जागा आपल्याच मालकीची असल्याचे म्हटले. त्यावर कडी म्हणून त्यांनी जेसीबी लावून हा प्रतापही केला. ज्यामुळे त्यांच्याविरोधात म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. घटनेची पडताळणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस पोहोचले तेव्हा महाराजांनी कथीतपणे पोलिसांनाही सुनावले. त्यावर मग पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवताच ते जमीनीवर आले.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी चैतन्य महाराज वाडेकर यांना त्यांच्या तीन भावांसह अटक केली आहे. त्यांच्या काही साथीदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय, कथीत गुन्ह्यात वापरलेले वाहन म्हणून जेसीबीही पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर महाराज आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या महोदयांचा वेगळाच प्रताप या निमित्ताने पुढे आला आहे. सोशल मीडियावर आज असे अनेक लोक आहेत. जे आपण विशेष कोणी असल्याचे दावे करतात. प्रत्यक्षा मात्र त्यांचा खरा चेहरा पुढे येतो तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.