Pune Bypoll Election: पिपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? राजकीय वर्तुळात उत्सुकता
निवडणूक आयोगाने या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) विधानसभा मददारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा, परंपरा आणि संकेत यांना अनुसरुन ही निवडणूक बिनविरोध होणार की सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि अपक्ष असा सामना रंगणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी (By Poll Election) 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध
शिवसेना आमदार रमेश लटके (उद्धव ठाकरे गट) यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व जागेवर पोटनिवडणूक लागली होती. अनेक राजकीय शह-काटशह आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. या ठिकाणी भाजपने उमेदवार दिला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी मागे घेत ही निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून आल्या. (हेही वाचा, Assembly Bypolls in Maharashtra Dates: कसबा पेठ, चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला; 2 मार्चला निकाल)
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक सामना रंगला
दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारत भालके निवडणून आले होते. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे रिक्त जागेवर लागलेल्या पोट निवडणुकीत भाजपने समादान औताडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निवडणूक लागली. या निवडणुकीत संघर्ष झाला औताडे निवडूण आले. त्यामुळे आता कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत काय होते याबाबत उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसा, कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2023 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 07 फेब्रुवारी 2023 हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 08 फेब्रुवारी 2023 रोजी होईल. 10 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी दाखल केलेले अर्ज परत घेता येतील. प्रत्यक्ष मतदान 27 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडेल. तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
बिनविरोधाची परंपरा
एखाद्या विद्यमान आमदार, खासदारचे निधन झाले तर त्या ठिकाणी शक्यतो निवडणूक बिनविरोध करायची असा महाराष्ट्रात पायंडा आहे. पाठिमागील अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा अपवाद वगळता कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, अलिकडील काही वर्षांमध्ये राजकीय मंडळी आणि पक्षांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने परस्परांविरोधात निवडणूक अर्ज दाखल केले जातात. परंपरा पाहता शक्यता ज्या आमदाराचे निधन झाले आहे त्या आमदाराच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तिला उमेदवारी दिली जाते. तसेच, सदर व्यक्तीप्रती आदर म्हणून विरोधी पक्ष उमेदवार देत नाहीत. त्यामुळे आता कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये ही परंपरा पाळली जाणार का? याबात उत्सुकता आहे.