PILs against MediaTrial in Sushant Sing Rajput Case: माध्यमांनी तपासावर परिणाम होईल अशी माहिती जाहीर करू नये: बॉम्बे हाय कोर्ट

आज त्यावर सुनावणी करताना माध्यमांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपासावर परिणाम होईल अशी माहिती जाहीर करू नये असं म्हटलं आहे.

Bombay High Court (Photo Credits: Twitter/ ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Sing Rajput) सारख्या उमद्या कलाकाराने गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर अनेकांना त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न पडला आहे. सुरूवातीला मुंबई पोलिस करत असलेला या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय कडे गेला आहे. परंतू मागील काही दिवसांमध्ये या प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याच्या कारणावरून 8 माजी डिरेक्टर जनरल पद भूषवलेल्या निवृत्त IPS ऑफिसर्सनी बॉम्बे हाय कोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली. आज त्यावर सुनावणी करताना माध्यमांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपासावर परिणाम होईल अशी माहिती जाहीर करू नये असं म्हटलं आहे.

दरम्यान कोर्टात आज देण्यात आलेल्या माहितीनुसार यचिका कर्त्यांची मागणी आहे की वार्तांकन करताना माध्यमांनी ते जबाबदारपणे करावं तसेच त्यासाठी विशिष्ट गाईडलाईन म्हणजेच नियमावली असावी. तसेच या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टाने हा आदेश दिला आहे. आज कोर्टाच्या सुनावणी दरम्यान मीडीयाच्या वतीने कुणीही उपस्थित नव्हते.

आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी निवृत्त आयपीएस ऑफिसर्सकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेचं स्वागत केले आहे. मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस दल यांची तुलना स्कॉट्लंडच्या पोलिसांसोबत होते. अशावेळेस सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं जात आहे ते पाहता याचिकेचं स्वागत करतो असं देशमुख म्हणाले आहेत.

मुंबईमध्ये सध्या सीबीआय पथक दाखल असून मुंबई पोलिस त्यांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी शोध, चौकशीसाठी मदत करत आहेत.