Phone Tapping Case: फोन टॅप प्रकरणी Nana Patole यांनी उचलले मोठे पाऊल; Rashmi Shukla यांच्याविरुद्ध दाखल केला 500 कोटींचा मानहानीचा दावा (Watch Video)
सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या आणि हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती झालेल्या शुक्ला यांनी, 16 मार्चनंतर दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिसांसमोर हजेरी लावण्याची ही दुसरी वेळ होती.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुधवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला. पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या फोन टॅप कटामागील सूत्रधार कोण? या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याची गरज आहे. राज्यातील ज्येष्ठ राजकारण्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला बुधवारी कुलाबा पोलिसांसमोर हजर झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेतून दिलासा देत, 16 आणि 23 मार्च रोजी कुलाबा पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.
2019 मध्ये रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर प्रमुख असताना शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्यांच्यावर या महिन्याच्या सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शुक्ला यांच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवला होता.
आज नाना पटोले म्हणाले, फोन टॅप केल्याप्रकरणी योग्य प्रकारे चौकशी होईल असे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार झालेल्या तपासणीमध्ये रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. आज आम्ही त्यांच्याविरुद्ध 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. अशा चुकीच्या पद्धतीने कोणाच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्याला त्रास देणे, ब्लॅकमेल करणे असे प्रकार बंद व्हावेत हा या दाव्यामागील हेतू आहे.’ (हेही वाचा: 'किरीट सोमय्या यांच्या नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील आरोपांचे काय झाले?'; Nana Patole यांचा प्रश्न)
सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या आणि हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती झालेल्या शुक्ला यांनी, 16 मार्चनंतर दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिसांसमोर हजेरी लावण्याची ही दुसरी वेळ होती. त्या पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्या बुधवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आल्या आणि दुपारी 1 च्या सुमारास निघाल्या. न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना 1 एप्रिलपर्यंत दिलासा दिला असून तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे.'