Rashmi Shukla: ड्रग्जच्या नावाखाली नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह अनेकांचे फोन टॅप; गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping Case) राज्यात पुन्हा एकदा जोरदार चर्चेला आले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुप्तवार्था विभागाच्या पोलीस आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्जच्या नावाखाली नाना पटोले, बच्चु कडू यांच्यासह अनेकांचे फोन टॅप करण्याबाबत परवानगी घेतली. तर अनेकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले, असेही वळसे पाटील यांनी म्हटले.
रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याची माहिती देताना दिलीप वळसे पाटील यांनी 4 नावांचाही उल्लेख केला आहे. यात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकारने पोलीस महासंचालकांना आणि आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. परिणामी त्यांच्यावर पुणे येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Phone Tapping Case: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल)
रश्मी शुक्ला यांनी ज्यांचे फोन परवानगी घेऊन अथवा परवानगी न घेता टॅप केले. ते सर्व फोन क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तींची नावे ड्रग्जशी संबंधित असल्याचे सांगितले होते किंवा त्यांचा संबंध ड्रग्ज अथवा तत्सम अमली व्यवसायाशी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते.
धक्कादायक म्हणजे रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करण्यासाठी नावे बदलून परवानगी मागितली होती. नाना पटोले यांना अमजद खान, बच्चू कडू यांना निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांना तरबेज सुतार व अभिजित नायर, आशिष देशमुख यांना रघु चोरगे व महेश साळुंखे अशी नावे देण्यात आल्याचेही पुढे आले असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.