Online Appointment For Cremation In Nashik: नाशिक मध्ये अंत्यसंस्कारांसाठी ऑनलाईन नोंदणी द्वारा दिली जाणार वेळ; cremation.nmc.gov.in वर मिळणार स्लॉट

Cremation | Photo Credits: pixabay.com

हॉस्पिटल मध्ये कोरोनाचे उपचार मिळावे म्हणून जशी रूग्णांच्या नातेवाईकांना प्रतिक्षा करावी लागत आहे तशीच मृत्यूनंतर देखील नातेवाईक अंत्यविधींसाठी तासनतास स्मशानात उभे असल्याचं चित्र आहे. नाशिक मध्ये हीच गैरसोय ओळखून आता पालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक महानगर पालिकेने (Nashik Mahanagar Palika) यासाठी cremation.nmc.gov.in ही वेबसाईट खुली आहे आणि त्यावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी (Last Ritual) वेळ दिली जाणार आहे.

नाशिक महानगर पालिका आता www.cremation.nmc.gov.in या वेबसाईट वर नागरिकांना जवळच्या कोणत्या स्मशानगृहात जागा रिकामी आहे त्याची माहिती देणार आहे. संबंधित कुटुंब अंत्यसंस्कारासाठी जशी माहिती दिली जाईल तशी ऑनलाईन स्लॉट बूक करू शकणार आहे. त्यांचा स्लॉट बूक झाल्यानंतर एक मेसेज मिळेल. बुकिंगची पावती देखील दिली जाणार आहे. ती डाऊनलोड करावी लागेल. ती पावती स्मशानगृहात दाखवल्यानंतर निर्धारित वेळेतच अंत्यसंस्कारांसाठी प्रवेश दिला जाईल. आजपासून सुरू झालेल्या या नव्या सोयीमुळे नाशिक मध्ये 27 स्मशानगृहांची माहिती अपडेट केली जाणार आहे.

कोरोनाची संकटात सध्या महाराष्ट्रासग देशभर आलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीच्या रूपात मागील काही दिवसांत धुमाकूळ घालत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांप्रमाणेच त्याच्यामुळे मृत्यूमुखी पडणार्‍या लोकांचा आकडा देखील धडकी भरावणारा आहे. त्यामुळे आता स्मशानगृहांवर देखील ताण वाढला आहे. अनेकदा कोविड 19 रूग्णांचे मृतदेह अत्यंत असंवेदनशील पणे हाताळत असल्याचे चित्र देखील समोर आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकाचा शेवटचा प्रवास देखील सन्मानपूर्वक व्हावा असे सांगत त्यासाठी आवश्यक यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता नाशिकमध्ये ही अंत्यविधींसाठी नवी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.