Passing Criteria for SSC Board Exam: दहावी बोर्ड परीक्षेत विज्ञान, गणित विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांतील निकषात बदल नाही; बोर्डाची माहिती

ज्या वर्षी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निकषांत बदल होतील, त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्रपणे कळवले जाणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिलं आहे.

Students | Twitter

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) यंदाच्या दहावी (SSC), बारावी (HSC) परीक्षांच्या तारखा आणि विषय निहाय अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी बोर्डाने यंदाच्या निकालामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी निकषांमध्ये कोणतेही बदल नसल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानामध्ये पास होण्यासाठी किमान 35 गुण मिळवणं आवश्यक आहे त्याबाबतचं स्पष्टीकरण बोर्डाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आणि परीक्षेला सामोरं जाताना किमान 35 मार्कांच्या उद्देशानेच तयारी करावी असं आता स्पष्ट झालं आहे. Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा .

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठीच्या नियमात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार, 10वी मध्ये गणित आणि विज्ञान विषयात पुढे शिक्षण घ्यायचे नसल्यास अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी किमान 20 गुण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यांच्या गुणपत्रिकेवर तसा शेरा मारून त्यांना 11वी मध्ये गणित आणि विज्ञान विषय न घेता पुढील शिक्षण घेता येणार आहे. मात्र या बदलाच्या अंमलबजावणीचा अद्याप निर्णय झालेला नाही. नक्की वाचा:  महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती. 

ज्या वर्षी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निकषांत बदल होतील, त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्रपणे कळवले जाणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिलं आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मीडीयाशी प्रतिक्रिया देताना ,' राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतूद हा केवळ प्रस्ताव आहे. त्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असल्याचं समोर आलं असल्याने राज्य मंडळाकडून स्पष्टीकरण दिले जात आहे. 2025 च्या बोर्ड परीक्षेसाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोणताही बदल करायचा असल्यास त्यापूर्वी शासन मान्यता, शासन निर्णय अशा प्रक्रिया असते. ' असेही ते म्हणाले आहेत.