तुळजापूरच्या भवानीमातेच्या मंदिरातील पास पद्धत 31 डिसेंबरनंतर बंद; भाविकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
दर्शनसाठी, अभिषेकासाठी किंवा मंदिरातील इतर गोष्टींसाठी भाविकांना पास घ्यावा लागतो
तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरात (Shri Tuljabhavani Mandir) गेले दोन वर्षांपासून पास सिस्टीम चालू आहे. दर्शनसाठी, अभिषेकासाठी किंवा मंदिरातील इतर गोष्टींसाठी भाविकांना पास घ्यावा लागतो. मात्र या पासमुळे भाविकांना मनःस्ताप होत आहे. पास असूनही दर्शनाचा नंबर वेळेत येत नाही अशाप्रकारच्या तक्रारी भाविकांनी केल्या होत्या. त्यामुळे आता मंदिरातील पास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 डिसेंबरपासून तुळजापूरच्या मंदिरात भाविक थेट दर्शन घेऊ शकणार आहेत. भाविकांना सहजपणे सुलभ दर्शन व्हावे म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी दोन वर्षापूर्वी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात पास व्यवस्था सुरु केली होती. त्रिलोक कंपनीमार्फत ही यंत्रणा राबविण्यात आली आहे.मात्र पास असूनही भाविकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असे. याबाबत अनेक भाविकांनी तक्रारी केल्या होत्या. अखेर हे पास बंद व्हावेत म्हणून पाळीकर पुजारी मंडळ, भोपे पुजारी मंडळ, उपाध्ये पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर आता हे पास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: तुळजाभवानीच्या खजिन्यातील 71 पुरातन नाणी गायब)
मंदिरात भाविकांना मुख दर्शन, धर्म दर्शन, अभिषेक दर्शन आणि पेड दर्शन इत्यादी गोष्टींसाठी पास देण्यात येत होते. मात्र 31 डिसेंबरनंतर हे पास बंद होतील याआधी अनेक सरकारी योजनांची जाहिरातही या पासद्वारे केली गेली होती. बेटी बचाओ आणि बेटी पढाओ ही योजनाही अशा पासवर झळकली होती. दरम्यान, शनिवारी 20 मिनिटांसाठी ही पासची सिटीं बंद पडली होती, त्यानंतर भाविकांनी विनापास मंदिरात प्रवेश केला.