Pandharpur Wari 2021: आषाढी पालखी सोहळा यंदा तरी पायी निघणार का? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे वारकऱ्यांकडे लक्ष

या बैठकीकड सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pandharpur Wari 2021 | File Image)

तमाम वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठोबा. विठ्ठल दर्शन व्हावे आणि चंद्रभागेत स्नान व्हावे यासाठी अवघा वारकरी सांप्रदाय पंढरीची वारी (Pandharpur Wari 2021) काढतो आणि पंढरपूरात हजेरी लावतो. मात्र, गेल्या वर्षापासून जगभरात कोरोना महामारी संकट उभे ठाकले आहे. या संकटाचा महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला. परिणामी आषाढी पालखी सोहळा (Ashadi Palkhi Ceremony) दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला पायी जाऊ शकला नाही. त्यामुळे एसची बसच्या माध्यमातून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संतांच्या पादूका पंढरपूला नेण्यात आल्या. त्यामुळे यंदातरी आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार का? याबाबत वारकीर सांप्रदायाच्या मनात उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी पालखी सोहळ्याबाबत महत्वाची बैठक मुंबईत शुक्रवारी बोलावली आहे. या बैठकीकड सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी यंदा कोणत्याही स्थितीत आषाडी पालखी सोहळा पंढरपूरकडे पायी काढला जाईल, असे म्हटले आहे. गोसावी महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे आषाढी पालखी सोहळा पायी निघाला नाही. मधल्या काही काळात कोरोनाचे संकट कमी झाले होते. परंतू, जानेवारी महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. संक्रमितांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यावरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काही वारकरी आषाढी पालखी सोहळा यंदा पायी काढावा यासाठी आग्रही आहेत. तर कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार यंदाही पालखी सोहळा पायी काढण्यास मनाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही आग्रही वारकरी संघटना आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. यंदा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अनुक्रमे 1 आणि 2 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले जाणार आहे.