Kalyanrao Kale joins NCP: कल्याणराव काळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या मंचावर कल्याण काळे यांची प्रतिमा असलेला बोर्ड झळकला होता.
भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (Kalyanrao Kale Joins NCP) केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक (Pandharpur By-Election) प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. पक्षप्रवेशावेळी बोलताना कल्याणराव काळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता. परंतू आता आपण परत ट्रॅकवर आलो” असे काळे यांनी म्हटले. काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तर भाजपला धक्का बसल्याचे चित्र आहे.
कल्याणराव काळे यांना मानणारा एक मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कल्याणराव काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी 65 हजार मते मिळवली. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक 2019 ऐन तोंडावर असताना त्यांनी राष्ट्रओवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत भाजप प्रवेश केला. कल्याणराव काळे यांनी भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. माढा या प्रतिष्ठीत मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. आता विधानसभा पोटनिवडणुकीत ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
कल्याण काळे आणि भाजप यांच्यातील दुरावा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची त्यांची जवळीक गेल्या काही काळापासून अधिकच वाढली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या मंचावर कल्याण काळे यांची प्रतिमा असलेला बोर्ड झळकला होता. (हेही वाचा, Pandharpur By-Election: कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश जवळपास नक्की, भाजपला धक्का)
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजप कडून समाधान अवताडे रिंगणात आहेत. दरम्यान, मतविभागणी टाळण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत दोन्ही गट एकत्र करुन उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाल्याची चिन्हे होती. मात्र, राष्ट्रवादीने ऐनवेळी हादरा देत कल्याणराव काळे यांना आपल्याकडे खेचल्याचे चित्र आहे.