Nisarga Cyclone च्या संभाव्य धोक्यामुळे पालघर मध्ये 3 जूनला सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

कैलास शिंदे यांनी दिले आहे.

अम्फान चक्रीवादळ (Photo Credits- IMD)

महाराष्ट्रावर सुरु असलेली संकटांची मालिका काही संपायचे नाव घेत नाहीय. कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूने संपूर्ण देश हादरला असून आता एक नवीन संकट समोर येऊन उभं राहिल आहे. या संकटाचे नाव आहे 'निसर्ग चक्रीवादळ' (Cyclone Nisarga) . अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर 3 जून रोजी धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर वादळाची तीव्रता वाढेल. सुरूवातीस 2 जून रोजी पहाटे उत्तरेकडे हे वादळ सरकेल व नंतर वळून ते उत्तर-ईशान्येकडे जाईल आणि 3 जून रोजी उत्तर महाराष्ट्र, हरिहरेश्वर (रायगड) व दक्षिण गुजरात, दमण ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील (Palghar District) सर्व दुकाने, औद्योगिक व व्यापारी व आस्थापने  3 जूनला बंद ठेवण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहे.

लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, पालघर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिका-यांशी जिल्हाधिका-यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

हेदेखील वाचा- Nisarga Cyclone: लवकरच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार 'निसर्ग चक्रीवादळ'; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश

निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत घेऊन 3 जूनला म्हणजेच उद्या पालघर जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागातील सर्व उद्योगांना आपली आस्थापने बंद करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.कच्च्या घरात, धोकादायक इमारतीत तसेच किनारपट्टी लगत राहणा-या लोकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम आजपासून हाती घेण्यात येणार आहे.

पुढील चार दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लहानमोठय़ा बोटी समुद्रात जाऊ नये यासाठी दल व सागरी पोलिसांमार्फत दक्षता घेण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांचे स्थलांतर केले जात असताना संबंधित नागरिकांनी आपली औषधे, मास्क, हात धुण्याचे साबण, खाद्यपदार्थ सोबत घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 3 जूनला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार व नाशिक आणि 4 जूनला नंदुरबार, धुळे व पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.