IPL Auction 2025 Live

Palghar: कोरोना व्हायरस चाचणीचा निकाल येण्याआधीच उरकले लग्न; तीन दिवसांनंतर नवरा मुलगा आढळला कोरोना संक्रमित, गुन्हा दाखल

सध्याच्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात सरकार विविध प्रकारे जनजागृती करत आहे, मात्र असे अनेक लोक आहे जे सरकारच्या नियामंकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्याच्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात सरकार विविध प्रकारे जनजागृती करत आहे, मात्र असे अनेक लोक आहे जे सरकारच्या नियामंकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत आहेत. आता महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात, एका 25 वर्षीय व्यक्तीविरूद्ध कोविड-19 चा चाचणी अहवाल समोर येण्यापूर्वीच विवाह केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नानंतर आलेल्या चाचणी अहवालात या व्यक्तीला कोविड-19 चा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. पालघरचे पोलिस पीआरओ सचिन नवाडकर (Sachin Navadkar) यांनी याबाबत माहिती दिली. ही व्यक्ती, त्याची आई व इतर काही नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जव्हारच्या केळघर भागात हा विवाह सोहळा संपन्न झाला. महत्वाचे म्हणजे या विवाहासाठी जवळजवळ 100 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. वाड्यातील लॅबमध्ये सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने, कोरोना व्हायरस चाचणीसाठी आपला स्वॅब नमुना दिला होता. मात्र याचा रिझल्ट येण्याआधीच त्याने 11 जून ला लग्न केले व लग्नानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. जव्हारमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी तीन दिवसांनंतर त्याचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर, त्याला रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीने लग्नात आलेल्या 100 हून अधिक पाहुण्यांचा जीव धोक्यात घातले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य)

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे लग्नाच्या कार्यक्रमास 50 अतिथींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र या लग्नात सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. जव्हार पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगा यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन अधिनियम, साथीचे अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी सध्या या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 100 हून अधिक लोकांची चौकशी करत आहेत.