IPL Auction 2025 Live

Osmanabad News: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात रुग्णालयाच्या बाथरुममध्ये महिलेची प्रसुती

ही घटना दस्तुरखूद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याच मतदारसंघात घडली. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात अशी अवस्था असेल तर उर्वरीत राज्यात काय घडत असेल असा सवाल आता निर्माण झाला आहे.

Tanaji Sawant | (Photo Credits: Facebook)

जिल्हा शासकीय महिला रुग्णालयात एका महिलेची चक्क बाथरुममध्ये प्रसुती (Delivery in Toilet) झाली आहे. ही घटना दस्तुरखूद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याच मतदारसंघात घडली. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात अशी अवस्था असेल तर उर्वरीत राज्यात काय घडत असेल असा सवाल आता निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे बाथरुममध्ये प्रसुती झाल्यावर पुढचा एक तास या महिलेकडे कोणी पाहिले देखील नाही. ही महिला रुग्णालयात आली तेव्हा तिला बेड मिळाला नाही. त्यानंतर तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. नंतर ती बाथरुममध्ये गेली. तिथेच तिची प्रसुती झाली.

रूक्मिणी सुदर्शन सुतार या 19 वर्षीय महिलेसोबत ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. रुक्मिणी यांचे सासर बार्शी (Barshi) तालुक्यातील नारीवाडी तर तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) हे माहेर आहे. त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात (District Women Hospital Osmanabad) प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. या वेळी त्यांना तातडीने बेड मिळाला नाही. त्यानंतर रात्री आकरा वाजणेयच्या सुमारास त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या. त्यानंतर त्या रुग्णालयातील स्वच्छतागृहात गेल्या. त्यांना वेदना असहय्य झाल्यानंतर त्या तिथेच बाळंत झाल्या. (हेही वाचा, BMC: मुंबई महापालिकेचा कारभार CAG तपासणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने वेगळाच दावा केला आहे. सदर महिला रुग्णालयात दाखल झाली तेव्हापासून तिच्यावर डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष होते. तिला रुग्णालयात दाखलही करुन घेतले होते. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी तिला वेळोवेळी विविध सूचना देत होते. परंतू, त्या सूचनांकडे ती अजिबात लक्ष देत नव्हती, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.