धक्कादायक: तब्बल साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक; कोट्यावधी रुपयांची चोरी
बँकेकडून वेळोवेळी जनजागृती होऊनही, सुशिक्षित लोक अशा घटनांचे बळी पडत आहेत
तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली, सोशल मिडियाचा वापर वाढला मात्र आता याचे तोटेही दिसून येत आहेत. सध्या सायबर चोरांचे वाढते प्रमाण प्रशासनासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. पुण्यात एका वर्षात तब्बल साडेपाच हजार लोकांना या चोरांनी गंडा घालून, कोट्यावधी रुपये लंपास केले आहेत. बँकेकडून वेळोवेळी जनजागृती होऊनही, सुशिक्षित लोक अशा घटनांचे बळी पडत आहेत हे मोठे आश्चर्य आहे. याबाबत आतापर्यंत पुणे पोलिसांनी 49 जणांना ताब्यात घेतले आहेत. दरम्यान नुकतेच पुण्यात एकाच दिवशी ऑनलाईन फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये 3 लाख 97 हजार 148 रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
बँकेतून बोलत आहे, अमुक एका स्कीमचे तुम्ही विजेते ठरला आहात, पीएफवर नॉमिनी म्हणून तुमचे नाव आहे अशी अनेक कारणे सांगून तुमची माहिती, बँकेची माहिती घेतली जाते. त्यानंतर तुमचे खाते हॅक करून त्यातून पैसे उकळले जातात. किंवा विविध करणे सांगून तुम्हाला ऑनलाईन खात्यात रक्कम भरायला सांगितली जाते. अशाप्रकारे हॅकर्सनी वर्षभरात तब्बल साडेपाच हजार पुणेकरांच्या बँक खात्यातून कोट्यावधींची रक्कम लंपास केली आहे़. आपली ऑनलाईन फसवणूक झाली असल्याचे वर्षभरात 5 हजार 507 अर्ज आले होते़, पैकी 300 जणांना त्यांचे 4 कोटी रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे. (हेही वाचा : व्यावसायिकाला गंडा; फक्त Missed Calls देऊन लुटले तब्बल 1.86 कोटी)
वर्षातील सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता़. हकर्सनी एकाच वेळी 29 देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल 94 कोटी रुपयांची चोरी केली होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बँक तुम्हाला कोणतीही माहिती मागत नाही, तसेच सोशल साईटवर ओळख झालेल्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका, कोणीही ऑनलाईन पैसे भरायला सांगितल्यावर संपूर्ण सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका असे इशारे पोलिसांकडून देण्यात येत आहेत.