Online Employment Fair: कोरोना विषाणूच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून नोकरीच्या संधी; 3,401 पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कुठे कराल अर्ज

सध्या लॉक डाऊन (Lockdown) मध्ये शिथिलता आली असली तरी, आर्थिक बाबी पूर्वपदावर येण्यास बराच काळ लागणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (File Photo)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) सध्या अनेक लोकांचा रोजगार (Employment) गेला आहे. सध्या लॉक डाऊन (Lockdown) मध्ये शिथिलता आली असली तरी, आर्थिक बाबी पूर्वपदावर येण्यास बराच काळ लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने 18 ते 23 सप्टेबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात 3,401 पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहेत. एम्प्लॉयरकडून उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहे.

या ठिकाणी करा अर्ज -

या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉगइन करुन, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जावून मुंबई शहर सिलेक्ट करावे. नंतर पुढे एम्प्लॉयर सिलेक्ट करावा व इच्छुक रिक्त पदाकरीता अप्लाय करावे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती छाया कुबल यांनी केले आहे.

कोरोना संकटामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या काळात काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय, उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत असल्याने, नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पदांची नावे –

या मेळाव्यात मुंबई शहर जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे कॉलींग प्रोसेसर, फील्ड सेल्स, लोन प्रोसेसर, बाइकर ऑफ डिलिव्हरी, इन्शुरन्स सेल्स, रिकव्हरी मॅनेजर, पॅकर, लोडर, हेल्पर प्रमोटर, डॉक्युमेंट कलेक्शनर, टेलर, सीवींग मशिन ऑपरेटर, टेरिटरी एक्झिक्युटिव्ह, सिनिअर टेरिटरी एक्झिक्युटिव्ह, टेलीसेल्स कॉलर, इन्स्टॉलेशन टेक्निशिअन, ईएमआय प्रोसेसर, हाऊसकिपर, कॅश कलेक्शनर इत्यादी पदे उपलब्ध आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारच्या रोजगारासंबंधी योजनांचा लाभ घेण्यासाठी Aadhaar Link व इतर माहिती अपडेट करण्याचे आवाहन; 30 सप्टेंबर पर्यंत मुदत)

मेळाव्यासाठी कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी ऑनलाईन पद्धतीने दूरध्वनी, भ्रमणध्वनी तसेच स्काईप आदींच्या माध्यमातून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.