Gokul Election Result 2021: गोकुळमध्ये अखेर सत्तांतर, सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा एकहाती विजय
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कोरोना संसर्गाचा प्रसार होत असतानाही प्रचाराचा धुरळा उडाला होता.
Gokul Election Final Result 2021: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कोरोना संसर्गाचा प्रसार होत असतानाही प्रचाराचा धुरळा उडाला होता. 2 मे रोजी जिल्ह्यातील 70 मतदार केंद्रांवर मतदान पार पडले असून 99.78 टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकताच या निवडणुकीचा निकाल समोर आला असून मतदारांनी सतेज पाटील (Satej Patil) यांच्या बाजूनेच कौल दिला आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला 21 पैंकी 17 जागांवर विजय मिळवता आला आहे.
गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. दरम्यान, सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी आणि राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. परंतु, सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर, आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली आहे. हे देखील वाचा- Gokul Election Results 2021: भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांची गोकुळ दूध संघांच्या संचालक पदी निवड
दरम्यान, गोकुळ दूधसंघात प्रतिदिन सुमारे 30 ते 35 लाख लिटर दूध संकलन होते. त्यामुळे सहाजिकच दूधसंघाचा विस्तार जिल्हाभर आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दूध वितरीत केले जाते. दूधसंखाचा व्याप मोठा आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या दूधसंघास जिल्ह्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघातच गेल्या काही वर्षात पडला आहे. परिणामी गोकुळ दूधसंघ निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.