मुंबई व पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग; राज्यातील Corona Virus बाधित रुग्णांची संख्या 41
मंगळवारी मुंबईत एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यापूर्वी, कलबुर्गी येथे एका 63 वर्षीय व्यक्तीचा आणि दिल्लीत 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे
भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संसर्गाची 137 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मुंबई (Mumbai) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) मंगळवारी प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. आता राज्यात संक्रमितांची संख्या 41 झाली आहे. यामध्ये 27 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. त्याच वेळी, देशभरात या विषाणूमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी मुंबईत एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यापूर्वी, कलबुर्गी येथे एका 63 वर्षीय व्यक्तीचा आणि दिल्लीत 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणांची संख्या वाढतच आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांद्वारे या विषाणूने भारतात शिरकाव केला व आता त्याने आपले महाकाय रूप धारण करायला सुरुवात केली आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकारने अनेक सेवा बंद केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार कमीत कमी मनुष्यबळामध्ये कसे काम करता येईल याचा आढावा घेत आहे. मात्र सध्या तरी मुंबईमधील कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होणार नाही, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी देण्यात आली नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सामान्य नागरिकांचा प्रवेश निषिद्ध; मंत्र्यांनाही पाळावे लागणार काही नियम, घ्या जाणून)
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मध्य रेल्वेने आपल्या अनेक रेल्वे काही कालावधीकरिता रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, निझामाबाद एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, मनमाड एक्सप्रेस अशा महत्वाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. तसेच पुणे शहरातील आरटीओ कार्यालय, आधार केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुणे शहरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. तर 24 रुग्णांना उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे.