Raj Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके वाटप, गजानन काळे यांनी दिली माहिती
नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केलेला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा उद्या म्हणजेच 14 जून रोजी वाढदिवस... यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांनाही आवाहन केले आहे. तरीही कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्य करण्याचा उपक्रम हाती घेत आहे. यात नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केलेला आहे. यात 100 मराठी पुस्तकांचा समावेश आहे. टीव्ही9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणा-या या उपक्रमात सुप्रसिद्ध लेखक/कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व. पु. काळे, ना. धों . महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व. पु. काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं , सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांचा समावेश आहे.हेदेखील वाचा- Raj Thackeray यांचं वाढदिवसांच्या पार्श्वभूमीवर भेटण्यासाठी गर्दी टाळण्याचं मनसे सैनिकांना आवाहन; लवकरच पक्षांच्या धोरणाविषयी संवाद साधण्याचे दिले संकेत
नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता 'मनसे प्रयत्न' या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मत सांगत असताना गजानन काळे यांनी असे म्हटले आहे की, “राजसाहेब ठाकरे हे सध्याच्या राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व असून विविध पुस्तके वाचण्याचा छंद राजसाहेबांना आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. पुस्तक वाचल्याने प्रगल्भ आणि सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते आणि म्हणूनच नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरिता नवी मुंबई मनसेचा हा छोटासा प्रयत्न आहे”, असं मत गजानन काळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कोरोनाचा धोका लक्षात घेत माझ्या वाढदिवसादिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.