मराठी रंगभूमी दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला नाट्य निर्माते व कलाकारांशी संवाद; Coronavirus नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करण्याचे आवाहन

मात्र, अजूनही राज्यात कोरोना विषाणूची (Coronavirus) भीती कायम असून, निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा, कलाकार व प्रेक्षकांची काळजी घ्या. आता पुढील काळात अत्यंत खबरदारीने पाऊल टाकणे गरजेचे आहे,

CM Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

नाटकांसाठी सरकारकडून तिसरी घंटा वाजली आहे. मात्र, अजूनही राज्यात कोरोना विषाणूची (Coronavirus) भीती कायम असून, निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा, कलाकार व प्रेक्षकांची काळजी घ्या. आता पुढील काळात अत्यंत खबरदारीने पाऊल टाकणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त (Marathi Rangbhumi Din 2020) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाट्य निर्माते व कलाकारांशी साधला ई-संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चावरे, डॉ.गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य प्रसाद कांबळी आदि मंडळी उपस्थित होती.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोना नंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे आपण म्हणतो पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढले आहे याची जाणीव करून दिली.

चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावे, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी. थिएटरमध्ये सुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले. (हेही वाचा: Diwali 2020: दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेचे निर्बंध; राज्यातही आतषबाजीवर बंदी येण्याची शक्यता)

दुसरीकडे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.