Notorious Markets in India: मुंबई, दिल्ली आणि बंगळूरूच्या 'या' मार्केट्सचा जगातील कुप्रसिद्ध बाजारपेठांच्या यादीत समावेश, विकला जात आहे बनावट माल
या सर्व बाजारपेठा ट्रेडमार्क काउंटरफिटिंग आणि कॉपीराईट पायरसीसाठी ओळखल्या जातात.
Notorious Markets in India: देशातील 3 प्रमुख शहरांमध्ये स्थित 3 बाजारपेठा आणि इंडियामार्टसह 3 ऑनलाइन बाजारपेठांनी कुप्रसिद्ध बाजारपेठांच्या यादीत स्थान मिळवले आहे. कुप्रसिद्ध बाजारपेठांमध्ये दिल्लीतील करोल बागमधील टँक रोड, मुंबईतील हीरा पन्ना (Mumbai's Heera Panna) आणि बेंगळुरूच्या सदर पत्रप्पा रोड मार्केटचा समावेश आहे. अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हज (USTR) ने मंगळवारी 2023 वर्षासाठी जारी केलेल्या या अहवालात ही बाब समोर आली आहे. या यादीमध्ये एकूण एकूण 39 ऑनलाइन मार्केट आणि 33 ऑफलाइन मार्केटचा कुप्रसिद्ध बाजारपेठांच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे. अहवालामध्ये चीनने पहिला क्रमांक पटकावला आहे.
अहवालानुसार, इंडियामार्ट व्यतिरिक्त, भारतात कार्यरत Vegamovies आणि WHMCS Smarters देखील या कुप्रसिद्ध यादीत सामील झाले आहेत. या सर्व बाजारपेठा ट्रेडमार्क काउंटरफिटिंग आणि कॉपीराईट पायरसीसाठी ओळखल्या जातात. यूएस व्यापार प्रतिनिधी कॅथरीन टाय यांनी सांगितले की, ‘अशा बनावट मार्केट्समुळे कामगार, ग्राहक, छोटे व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे कुप्रसिद्ध बाजारपेठांची ही यादी अतिशय महत्त्वाची ठरते. हे आम्हाला बनावट वस्तूंशी लढण्यास मदत करते.’ टाय यांनी पुढे अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी या सर्व बाजारांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले.
कुख्यात बाजारांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या चीनमधील सर्व बाजारपेठा सर्व प्रकारच्या बनावट वस्तूंच्या निर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहेत. चीनच्या ई-कॉमर्स आणि सोशल कॉमर्स मार्केट Taobao, WeChat, DHGate आणि Pinduoduo व्यतिरिक्त, क्लाउड स्टोरेज सेवा Baidu Wangpan देखील या यादीत समाविष्ट आहे. यासोबतच चीनच्या प्रमुख 7 ऑफलाइन मार्केटचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व चिनी बाजारपेठांमध्ये बनावट वस्तूंचे उत्पादन, वितरण आणि विक्री केली जाते. (हेही वाचा: Shiv Sena UBT on BMC: ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर; शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र)
दरम्यान, अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हज पहिल्यांदा 2006 मध्ये अशा बाजारांची माहिती दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2011 पासून दरवर्षी ही यादी प्रसिद्ध केली जात आहे. या यादीत चीन पहिल्या स्थानावर कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. 2022 मध्ये यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने जप्त केलेल्या मालांपैकी सुमारे 60 टक्के माल चीन आणि हाँगकाँगमधून आलेला बनावट माल आहे. कोविड-19 चे निर्बंध संपल्याने अशा वस्तूंचा पूर पुन्हा आला आहे. या यादीत भारतामधील मुंबई, दिल्ली, बंगळूरूव्यतिरिक्त कोलकात्याच्या किदरपूर मार्केटचा समावेश करण्यात आला आहे.