COVID-19 Vaccine: महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत- राजेश टोपे
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली आहे. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण (COVID-19 Vaccine) मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली आहे. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारताने यामध्ये मागे टाकले आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
देशात शनिवारी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काल एका दिवसात देशभरातील एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. तर, महाराष्ट्रात एकूण 18 हजार 425 जणांना कोरोनाची लस टोचवण्यात आली आहे. मात्र, राज्यात अद्याप एकही दुष्परिणामाची नोंद झाली नाही. तसेच ही लस आतापर्यंत सुरक्षित ठरली असल्याचा दावा, राजेश टोपे यांनी केला आहे. हे देखील वाचा- Anna Hazare: कोरोना लसीकरणाबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मोठे वक्तव्य
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हादरून सोडले आहे. या महामारीमुळे देशातील नागरिकांना आर्थिक, बेरोजगारी यांसारख्या अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र, कोरोना संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आता यश आल्याचे दिसत आहे. लवकरच महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून मुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात एकूण 3 हजार 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 90 हजार 759 वर पोहचली आहे. यापैकी 18 लाख 86 हजार 469 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात कोरोनामुळे 50 हजार 738 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 52 हजार 562 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.