'मुंबईत सदनिका विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी सोसायटीच्या NOC ची गरज नाही'- मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई हे जगभरातील आघाडीचे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि जर का इथे एखाद्या मालकाला त्याची सदनिका विशिष्ट जात, धर्म किंवा समुदायातील व्यक्तीला विकण्याची किंवा भाड्याने देण्याची परवानगी सोसायटीकडून दिली जार नसेल, तर यामुळे शहराची प्रतिमा खराब होईल

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मंगळवारी जाहीर केले की मालकाला आपली सदनिका विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या पूर्व परवानगीची (NOC) आवश्यकता नाही. यामुळे मालकाला त्रास-मुक्त पद्धतीने व्यवहार करण्यास मदत होईल. तसेच असे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सोसायटी बॉडी वेळ घेत असल्याने तो त्रास आणि कथित छळही टाळता येईल. त्यामुळे इथून पुढे मुंबईत फ्लॅट विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी गृहनिर्माण संस्थेकडून कोणत्याही एनओसीची गरज भासणार नाही

हाउसिंग सोसायट्या जात, पंथ, धर्म आणि समुदायाच्या आधारे भेदभाव करत, त्या अनुषंगानेच सदनिका मालकाला विकण्याची किंवा भाड्याने देण्याची परवानगी देत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशिष्ट समुदायाचे वर्चस्व असलेल्या भागात, फक्त अशाच लोकांना सदनिका खरेदी करण्याची परवानगी दिली जात आहे. इतर काही भागात अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीय सदस्यांना सदनिका विकणे किंवा भाड्याने देणे प्रतिबंधित केले आहे, यामुळे द्वेष वाढत आहे.

सोसायट्यांनी ठराविक जात, पंथ, धर्म आणि समुदायाला फ्लॅट विकण्यास किंवा भाड्याने देण्यास बंदी घातली तर समाजात आणखी फूट पडेल. उपनियमानुसार, मालकाला सदनिका विकण्यासाठी किंवा ती भाड्याने देण्यासाठी सोसायटीच्या परवानगीची आवश्यकता नाही. तरीही सोसायट्या त्यांच्या मंजुरीसाठी आग्रही आहेत. परंतु मालकाला त्याचा फ्लॅट कोणालाही भाड्याने द्यायचा असेल किंवा फ्लॅट विकायचा असेल तर त्याला सोसायटीकडून एनओसीची गरज नाही. (हेही वाचा: महाराष्ट्रात आजपासून लोडशेडिंग सुरू, मात्र 'या' भागांना मिळणार दिलासा)

आव्हाड पुढे म्हणाले की, मुंबई हे जगभरातील आघाडीचे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि जर का इथे एखाद्या मालकाला त्याची सदनिका विशिष्ट जात, धर्म किंवा समुदायातील व्यक्तीला विकण्याची किंवा भाड्याने देण्याची परवानगी सोसायटीकडून दिली जार नसेल, तर यामुळे शहराची प्रतिमा खराब होईल. 2014 मध्येच सहकारी संस्थांच्या उपनियमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे, ज्यानुसार सदनिका खरेदी-विक्रीसाठी किंवा जागा भाड्याने देण्यासाठी/घेण्यासाठी सोसायटीकडून एनओसी घेण्याची आवश्यकता नाही. मालक सोसायटीच्या परवानगीशिवाय आपले घर कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीला विकू शकतो आठवा भाड्याने देऊ शकतो.