गुजरातमध्ये स्वबळावर राष्ट्रवादी लढवणार सर्वच्या सर्व जागा; जागावाटपाच्या वाटाघाटींवर एकमत न झाल्याने घेतला निर्णय

गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी ही माहिती दिली

शरद पवार (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात राष्ट्रवादीने कॉंग्रेससोबत महाआघाडी केल्यानंतर, आता गुजरात राज्यात राष्ट्रवादीने (NCP) सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी ही माहिती दिली. गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस 26 जागा लढवणार आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीकडून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. मात्र राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांत गुजरातमध्येही युती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आघाडी नाही झाली तर याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.

याआधी 2004 आणि 2014 च्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली होती. राष्ट्रवादीने पोरबंदर, पंचमहल आणि गांधीनगर मतदारसंघ मागितला होता. 2004 मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला राजकोट तर 2014 मध्ये पोरबंदर मतदारसंघ दिला मात्र दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. 2014 मधील निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या सर्वच्या सर्व 26 जागा जिंकल्या होत्या. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपाच्या वाटाघाटींवर एकमत न होऊ शकल्याने राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: शरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख)

सध्या भाजपकडून गांधीनगरमधून अध्यक्ष अमित शाह रिंगणात उतरणार आहेत. पोरबंदरमधून रमेश धाडूक तर रतन सिंग यांना पंचमहालमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान हिंदुत्ववादी मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये महाराष्ट्रात युती झाली, मात्र बंगालमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.