Nitin Gadkari Threat Call Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरु येथून एक तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या तरुणीला मंगळुरू (Mangaluru) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या तरुणीबद्दल माहिती मिळताच नागपूर पोलिसांचे एक पथक तातडीने बेळगावला रवाना झाले आहे.
Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणीला मंगळुरू (Mangaluru) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या तरुणीबद्दल माहिती मिळताच नागपूर पोलिसांचे एक पथक तातडीने बेळगावला रवाना झाले आहे. नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ असलेल्या नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात काल (21 मार्च) सकाळच्या सुमारास तीन फोन आले. तिन्ही वेळी समोरुन अज्ञात व्यक्तीने नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिली. तसेच, आरोपींनी 10 लाख रुपयांची खंडणीही मागितली. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.
नागपूर पोलिसांच्या हवाल्याने एबीपी मझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गडकरी यांना दिलेल्या धमकी प्रकरणात पोलिसांनी रजिया नामक तरुणीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रजिया नामक तरुणीकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे की, जयेश पुजारी नामक व्यक्तीने तिला सांगितले होते की, 'तुझा नंबर एका कामासाठी दिला जात आहे.' दरम्यान, नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीनेही त्याचे नाव जयेश पुजारी असेच सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणातून आता मंगळुरु कनेक्शन पुढे आले आहे. (हेही वाचा, Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 10 कोटी रुपये खंडणीचीही मागणी)
अधिक माहिती अशी की, रजिया हिला करण्यात आलेला फोन कॉल आणि नितीन गडकरी यांना धमकी देण्यासाठी करण्यासाठी वापरण्यात आलेला फोन क्रमांक एकच आहे. शिवाय हा फोन बेळगाव येथील तुरुंगातूनच करण्यात आल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी सध्या स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. दुसऱ्या बाजूला नागपूर पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.