आदित्य ठाकरे, रोहित पवार टीशर्ट, जीन्स घालून मंत्रालयात उनाडक्या करतात; सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड नियमावरुन निलेश राणे यांची टीका

सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड निर्णयावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांना लक्ष्य करत सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

Nilesh Rane | (File Image)

महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi Government) कायमच लक्ष्य केले जात असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येते आहे. शक्ती कायद्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड निर्णयावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांना लक्ष्य करत सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार टीशर्ट, जीन्स घालून मंत्रालयात उनाडक्या करत असतात असं म्हणत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समान नियम असायला हवा, असे निलेश राणे यांचे म्हणणे आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मग हाच नियम मंत्री व आमदारांपण लागू करा. आदित्य ठाकरे (प्रदूषण मंत्री) रोहित पवार (स्वयम् घोषित नेता) आदी। टीशर्ट, जीन्स घालून मंत्रालयात उनाडक्या करत असतात. मंत्री, आमदार पण शासनाचा एक प्रकारे कर्मचारीच."

Nilesh Rane Tweet:

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख स्वयं घोषित नेता असा केला आहे. तसंच मंत्री आणि आमदार देखील सरकारी कर्मचारी असल्याने ड्रेसकोट चा नियम मंत्री आणि आमदरांसाठीही लागू करा, असे त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी राज्यात शक्ती कायदा लागू केल्यानंतर नितेश राणे यांनी या कायद्याअंतर्गत नि:पक्षपातीपणे निर्णय होईल अशी आशा आहे असे म्हटले होते. त्याचबरोबर शक्ती कायद्याचे नाव पूर्वी दिशा असे होते आणि ते एका विशिष्ट कारणामुळे बदलण्यात आल्याचे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नामोल्लेख टाळत निशाणा साधला होता. (Nitesh Rane on Aaditya Thackeray: 'दिशा' शब्दावरुन नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांना नामोल्लेख टाळत टोला)

दरम्यान, काल राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नवा नियम लागू केला. या नियमाअंतर्गत यापुढे कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यलयात जीन्स आणि टी- शर्ट घालता येणार नाही. महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, सलवार-चुडीदार, कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचाऱ्यांसाठी शर्ट, पॅन्टट्राऊझर पॅन्ट वापरणे बंधनकारक असणार आहे.