NIA Raids: एनआयएच्या छाप्यात राज्यातील ISIS मॉड्युलचा पर्दाफाश, 4 जणांना अटक
28 जून 2023 रोजी ISIS शी संबंधित 5 संशयित ठिकाणांवर NIA ने छापे टाकले होते. या छाप्यांमधून इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आणि ISIS शी संबंधित सामग्री असलेली अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे छापे टाकून महाराष्ट्रात ISIS च्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएच्या या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तबिश नसीर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा कोंढवा आणि शरजील शेख उर्फ जुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत. हे चौघेही इसिसच्या सूचनेनुसार भारतात काम करत होते. ताबिश हा मुंबईतील नागपाडा येथील रहिवासी आहे. जुबेर आणि अबू पुण्यातील तर शरजील ठाण्यातील पडघा येथील आहेत. (हे देखील वाचा: Mumbai: धक्कादायक! वरळी सी फेसमध्ये गोणीमध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह)
यापूर्वी सोमवारीही एनआयएने छापे टाकले होते. 28 जून 2023 रोजी ISIS शी संबंधित 5 संशयित ठिकाणांवर NIA ने छापे टाकले होते. या छाप्यांमधून इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आणि ISIS शी संबंधित सामग्री असलेली अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या छाप्यांमध्ये तरुणांना भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी करून ISIS मध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा पुरावा सापडला आहे.
अटक केलेल्या चार आरोपींबद्दल NIA ने केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की ते इस्लामिक स्टेट (IS) आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL) सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्या ISIS च्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असुन कट रचत होते. भारताची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बाधित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे लोक ISIS च्या मोठ्या कटाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने राज्यातील स्लीपर सेल तयार करून चालवण्याचे काम करत होते. अशा प्रकारे हे लोक भारत सरकारला आव्हान देत होते.
अबू नुसैबा, झुबेर नूर मोहम्मद शेख, ताबीश नासेर सिद्दीकी आणि जुल्फिकार अली बडोदावाला यांनी त्यांच्या साथीदारांसह तरुणांना आपल्या संघात सामावून घेत त्यांना शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले. या कामांशी संबंधित डू इट युवरसेल्फ (DIY) सारखी सामग्री दिली. तसेच, परदेशात उपस्थित असलेल्या ISIS च्या हस्तकांच्या सूचनेनुसार, दहशत आणि हिंसाचार पसरवण्याचा अजेंडा पुढे नेण्यासाठी 'व्हॉईस ऑफ हिंद' या मासिकात आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून ताब्यात घेतलेला झुबेर हा आयएसआयएस शिमोगा (कर्नाटक) च्या मॉड्यूलशी संबंधित होता.