New Year 2022 Guidelines: 31 डिसेंबर आणि नूतन वर्षारंभ 2022 साठी राज्य शासनाची नियमावली जाहीर; घरी राहून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन
नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमायक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे (New Year 2022) स्वागत अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जरी केल्या गेल्या आहेत.
- कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2021 रोजी व दि. 1 जानेवारी, 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे.
- मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या उपरोक्त 24-12-2021 रोजीच्या आदेशान्वये राज्यात 25 डिसेंबर, 2021 पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, सदर आदेशांचे पालन करण्यात यावे.
- कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.
- 31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष, 2022 च्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत, आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
- सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
- नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. (हेही वाचा: कोरोना निर्बंध अजून कडक करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा; पहा काय म्हणाले)
- तसेच 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.दरम्यान, मुंबईमध्ये कोविड-19 तसेच ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता, आज मंत्री आदित्य ठाकरे यांची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीएमसी कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करणे, 15-18 वयोगटातील मुलांच्या प्रस्तावित लसीकरणाची योजना आखणे, जे जानेवारीच्या सुरुवातीला करायचे आहे, याबाबत चर्चा झाली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 06:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

