New Mumbai: भटक्या कुत्र्यांना खायला घातले म्हणून सोसायटीने पाठवले 7 लाखाचे बिल; कुत्रा भुंकला तर 5 हजार दंड
या संदर्भात एड. सिद्ध विद्या यांनी सांगितले की, एस नागराजन यांनी प्राण्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये न्यायालयात प्राण्यांचे पाच अधिकार दिले गेले आहेत
नवी मुंबईतील (New Mumbai) एनआरआय कॉम्प्लेक्सने सोसायटीच्या आवारातील भटक्या कुत्र्यांना खायला घातले म्हणून सोसायटीमधील रहिवाशी महिलेला तब्बल 7 लाख रुपयांचे बिल पाठवले आहे. या अपस्केल रहिवासी संकुलाने आपल्या सोसायटीच्या आवारातील भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावर बंदी घातली आहे. सदस्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्या विविध सेवा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नवी मुंबईतील सर्वात मोठी हायप्रोफाईल सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनआरआय कॉम्प्लेक्स व्यवस्थापनाने काढलेला असा अजब फतवा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या फतव्यामध्ये कुत्रे भुंकले तर, कुत्र्यांना खायला देणाऱ्या रहिवाशांना पाच हजार रुपये दंड भरावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच जर त्या कुत्र्याने घाण केली तर 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. जर कुत्रा अंगावर धावून गेला तर 25 हजार रुपये दंड आणि जर त्याने कोणास चावला तर जेवू घालणाऱ्या नागरिकाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात येत आहे. एकप्रकारे हा फतवा प्राण्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप होत आहे.
याबाबत सोसायटीमधील काही लोकांनी अॅनिमल वेल्फेअरकडे तक्रार केली आहे. या संदर्भात एड. सिद्ध विद्या यांनी सांगितले की, एस नागराजन यांनी प्राण्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये न्यायालयात प्राण्यांचे पाच अधिकार दिले गेले आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा हक्क हिरावून घेणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वीच एनआरआय संकुलातून एका हरवलेल्या कुत्र्याचा मृतदेह सापडला होता. पोलीस ठाण्यात कुत्र्याला विष देऊन मारण्यात आल्याची तक्रार नोंदवल्यानंतर कुत्र्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळ येथे पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा: Aurangabad Crime: भांडण सोडविणाऱ्या पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबाद येथील घटना)
दरम्यान, पाम बीच रोडवरील NRI कॉम्प्लेक्स हे जवळजवळ 47 एकरच्या विस्तीर्ण जागेवर उभे आहे. याठिकाणी 5,000 हून अधिक रहिवासी असलेले 44 टॉवर आहेत. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. संकुलात मागच्या काही महिन्यापासून 15 पेक्षा अधिक श्वानाने चावण्याचे प्रकार घडले असून त्यात शालेय विद्यार्थी ते 80 वर्षीय जेष्ठ महिलांचा समावेश आहे.