New Maharashtra Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून CP Radhakrishnan यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या बाबी
सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते. सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
सी. पी. राधाकृष्णन यांनी 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
जाणून घ्या कोण आहेत सी.पी.राधाकृष्णन-
राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन 1998 मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.
आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.
सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते. सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. (हेही वाचा: Special Publicity Campaign: राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकार जाहिरातींवर खर्च करणार तब्बल 270 कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर)
दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्री. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे. राधाकृष्णन यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांग्लादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)