NEET परीक्षेतील गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा; ABVP कडून मागणी
निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नीट परीक्षेत (NEET Exam) झालेल्या गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. नीट परीक्षेत झालेला गोंधळ आणि पेपर लीक संदर्भात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नागपूरच्या व्हेरायटी चौकावर झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी एनटीएच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (हेही वाचा - NEET Exam 2024: देशभरातील राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षांमधील भ्रष्टाचाराकडे आदित्य ठाकरेंनी वेधलं केंद्र सरकारचं लक्ष; तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी केली 'ही' मागणी)
एकाच परीक्षा सेंटरवरील अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे संशयास्पद असून हा इतर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे. सरकारनं यंदाच्या परीक्षेत झालेले गोंधळ आणि गैरव्यवहारांची सीबीआयकडून तपासणी करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नीटची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. त्यात असा गोंधळ होणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळचं म्हणावं लागेल.
नीट परीक्षेच्या निकालामध्ये 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याशिवाय, 100 टक्के गुण मिळालेल्या 67 पैकी बहुतांश विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावरील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नीट प्रवेश परीक्षेतील गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षणाच्या ‘नीट’ या प्रवेशपरीक्षेमध्ये उत्तर भारतातील एका केंद्रातील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देत उत्तीर्ण केल्याची घटना समोर आली आहे.