Sharad Pawar On Narendra Modi: इंधनदरवाढीवरून मागच्या सरकारवर खापर फोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे उत्तर

दरम्यान, इंधनाचे दर शंभरीकडे झुकले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इंधनदरवाढीचा ठपका मागच्या सरकारवर ठेवला आहे.

Narendra Modi, Sharad Pawar (Photo Credit: PTI)

देशात सलग बारा दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, इंधनाचे दर शंभरीकडे झुकले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इंधनदरवाढीचा ठपका मागच्या सरकारवर ठेवला आहे. याशिवाय, आधीच्या सरकारने या विषयावर लक्ष केंद्रित केले असते तर, सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा पडला नसता, असे त्यांनी म्हटले होते. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिले आहे. केंद्रामध्ये 6 वर्षे सत्तेत राहूनदेखील त्यांना चुका दुरुस्त करता येत नसतील तर त्यावर काय चर्चा करणार? असा टोला पवारांनी लगावला आहे.

शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, इंधनदरवाढीवरून शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्याचा दोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरीत्या यापूर्वीच्या सरकारांना दिला आहे. यापूर्वीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबून राहणे कमी करण्यावर लक्ष दिले असते, तर मध्यमवर्गीयांवर दरवाढीचा भार पडला नसता, असे त्यांनी बुधवारी म्हणाले होते. परंतु, केंद्र सरकारमध्ये मागील सहा वर्षांपासून सत्तेत राहूनही चुका दुरुस्त करता येत नसतील तर त्यावर काय चर्चा करावी? असे शरद पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Nana Patole: 'आम्ही मागे हटणार नाहीत' काँग्रेस नेते नाना पटोले यांचा अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांना इशारा

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे झुकले आहेत. देशात आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या किंमतीत 39 पैशांनी तर, डिझेलच्या किंमतीत 37 पैशांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे मुंबईत प्रतिलीटर पेट्रोल खरेदी करण्यासाठी 97 रुपये तर, डिझेलसाठी 88 रुपये मोजावी लागत आहे. लवकरच हा आकडा शंभर ओलांडण्याची शक्यता आहे.